श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट, नाशिक

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी – गुरुमाऊली परमपूज्य  आण्णासाहेब मोरे

सदगुरु परमपूज्य मोरेदादा यांनी शेतामधुनच सुरु केलेल्या दिंडोरी प्रणीत सेवामार्गाच्या माध्यमातून गेल्या ६ दशकांपासून शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य केले जात आहे. सदगुरु दादांनंतर गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने गेल्या चार दशकांपासून दिंडोरी प्रणीत सेवामार्गाच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांच्या विकासासाठी १८ सूत्री ग्रामअभियानाच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने कार्य सुरु आहे. या उपक्रमांसाठी देशभरातून लाखो सेवेकरी कार्यरत आहेत. तसेच हे उपक्रम राबवितांना कोणतेही शासकीय अनुदान, निधी किंवा कोणत्याही प्रकारची स्पॉन्सरशिप वगैरे बाबींवर अवलंबून न राहता हे कार्य अगदी अव्याहतपणे सुरु आहे.

स्वत: गुरुमाऊली व सेवामार्गातील बहुतांश सेवेकरी हे शेतकरीच असल्याने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि शेती विषयक समस्यांची पूर्ण जाण आहे. म्हणूनच या विविध समस्या विनामुल्य पद्धतीने सोडविण्यात येतात. आपले शेतकरी बांधव कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये म्हणून शेती सोबतच आध्यात्म देखील सोप्या रितीने समजावून सांगण्यात येते. संस्थेच्या देश – विदेशातील असणाऱ्या ५००० सेवा केंद्रांद्वारे कृषी प्रतिनिधी तयार करून हे उपक्रम राबविण्यात येतात. या विभागाच्या माध्यमातून आजवरसंपूर्ण देशात सुमारे ४५० पेक्षाही अधिक कृषी मेळावेघेऊन बदलत्या काळानुसार सर्व शेतकऱ्यांना आधुनिक शेती व तंत्रज्ञानासह पारंपरिक शेती, अध्यात्मिक शेती आणि सेंद्रीय शेतीचे प्रबोधन केले जाते.

आम्ही सेंद्रिय, नैसर्गिक व आध्यात्मिक शेतीचे पुरस्कर्ते असून याबबत शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टीने विविध विनामुल्य प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. याद्वारे सेंद्रिय खत निर्मिती, कृषी जोडव्यवसाय, पशुधन व गोवंश संवर्धन, दुग्धव्यवास्थापन, गावराण बीज संवर्धन,कीड नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, फळ व फुलबाग व्यवस्थापन, चारा शेती, कृषी कायदेविषयक सल्ला, अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर, सिंचनाचे प्रकार, अशा अनेक विषयांवर प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येते. दर गुरुवार व रविवार रोजी महाराष्ट्रासह देशभरातूनहजारो शेतकरी या प्रशिक्षणांचा लाभ घेत आहेत. तसेच सेंद्रिय व नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या शेतमालाला योग्य भाव व मार्केट उपलब्धकरून दिले जाते. यासोबत अॅग्रो प्लेसमेंटच्या माध्यमातून हजारो अल्प भूधारक शेतकऱ्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

कृषी विषयक उपक्रमांचा वाढता व्याप लक्षात घेता अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि प्रधान सेवाकेंद्र दिंडोरी यांचेशी संलग्न अशी स्वतंत्र संस्था अस्तित्वात आली. गेल्या ५ वर्षांपासून या संस्थेमार्फतच वरील सर्व कृषी विषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत.संस्थेमार्फत दरवर्षी “जागतिक कृषी महोत्सव” आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाचे विशेष महत्व म्हणजे हा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कृषी विकासासाठी आयोजित केलेला एकमेव कृषी महोत्सव आहे. म्हणूनच या कृषीमहोत्सवास विनामुल्य प्रवेश दिला जातो. यामध्ये संस्थेच्या वरील सर्व उपक्रमांसह राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन, सरपंच मांदियाळी, बारा बलुतेदारांचे स्वयंपूर्ण गाव, कृषी वास्तूशास्त्रानुसार आदर्श शेती मॉडेल, देशी गायींच्या विविध प्रजाती व पशुधनाचे जिवंत प्रदर्शन,आठवडे बाजार, धान्य महोत्सव, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, कृषी प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, आशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. कृषी महोत्सवासाठी देश-विदेशातील सेवेकरी, शेतकरी, कृषी तज्ञ, पर्यावरण तज्ञ, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कृषी अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, शेती व बिगरशेती व्यावसायिक, गृहिणी यांचा लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदविला जातो. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ देशातील संशोधक वृत्ती जोपासणाऱ्या विद्यार्थी व शेतकरी यांना मोफत स्टॉल दिले जातात. तसेच कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा “कृषीमाऊली” पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

संस्थेची संरचना

सदगुरु परमपूज्य मोरेदादा

आमचे प्रेरणास्थान

सदगुरु परमपूज्य मोरेदादा हे हाडाचे शेतकरी होते. शेतामध्ये काबाड कष्ट करून सभोवतालच्या शेतकऱ्यांच्या सर्वच प्रकारच्या समस्यांची त्यांना जाणीव होती. स्वातंत्रोत्तर काळात देखील शेतकऱ्यांची सुरु असेलेली वाताहत पाहून दादांचे मन चिंतन करीत असे. यांच्यासाठी आपणच स्वत:हून पुढे आलो पाहिजे अशी दादांची भावना होती. म्हणूनच तत्कालीन उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये आपली स्वत:च्या शेतातील विहीर आसपासच्या सर्व शेतकऱ्यांना खुली करून दिली होती. दादांनी शेतीबरोबरच आध्यात्माची कास धरून या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास आपल्या शेतातूनच सुरवात केली होती. सदगुरु दादांच्या महानिर्वाणानंतर ही जबाबदारी गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांनी उचलली आणि बघता बघता या कार्यास व्याप्त स्वरूप प्राप्त झाले

गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे

प्रमुख – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर

प्रमुख – श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)

अध्यक्ष – श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट, दिंडोरी, जि.नाशिक

शेतकऱ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान देणे गरजेचे आहे आणि एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला आपला अनुभव सांगितल्यास तो लवकर पटतो म्हणूनच परमपूज्य गुरुमाऊलींनी शेतामध्येच शेतकऱ्यांना एकत्र करून सेंद्रिय विविध प्रयोग करून दाखविले. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाची गुणवत्ता आणि सात्विकता कशी चांगली असते हे शेतकऱ्यांना स्वत: सेंद्रिय शेती करून दाखविले आहे. दिंडोरी येथे स्वत: परमपूज्य गुरुमाऊली यांनी आध्यात्मिक शेती हा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. पिकांना, गायींना विविध वेदोक्त मंत्र, ऋचा विविध शास्त्रीय संगीतातील राग, मंदिरातील अभिषेकाचे तीर्थ, शेतीमध्ये केलेल्या अग्निहोत्राची रक्षा अशा नानाविध बाबींचा शेतीतील उत्पदनावर होणारा चांगला परीणाम हे प्रत्यक्ष कृतीतून घडवून सांगितला आहे. आजही दिंडोरी येथे भेट देऊन आपण ही आध्यात्मिक व सात्विक शेती आपण पाहू शकता. “उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी” हे शाश्वत सूत्र आहे. परंतु सध्याच्या काळात हा क्रम थोडा बदलला आहे, यामध्ये शेती मागे पडली आहे. म्हणूनच आजच्या सुशिक्षित युवापिढीने पुन्हा हे सूत्र दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. असा परमपूज्य गुरुमाऊलींचा आजच्या तरुणवर्गास संदेश आहे.

आदरणीय चंद्रकांत श्रीराम मोरे (दादासाहेब)

 • विश्वस्त
 • दुर्मिळ वनौषधी संशोधन व संवर्धन ग्रामअभियान व सेवाकेंद्रांचे प्रशासकीय कामकाज
 • सदगुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट 
 • आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र

आदरणीय नितीन श्रीराम मोरे (भाऊ)

 • विश्वस्त
 • संस्थेच्या १८ सूत्री ग्रामअभियानाचे परराज्य व देश-विदेशातील कामांचे नियोजन
 • बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग

आदरणीय गिरीश श्रीराम मोरे (आबासाहेब)

 • विश्वस्त
 • विश्वस्त सदस्य. कृषी विषयक संशोधन, शेतकरी गट, कृषी प्रशिक्षण शिबिरे, देशी गोवंश संवर्धन, इत्यादी.
 • संचालक: दिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रा.लि. (सात्विक कृषीधन)

  वाणिज्य शाखेची पदवीधर असूनही, पहिल्यापासून त्यांचा विशेष कल शेती व गौपालानाकडे होता. त्याच आवडीतून तसेच परमपूज्य गुरुमाऊलींच्या प्रेरणेतून त्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीत संशोधन करून शेतीसाठी आगळ्या-वेगळ्या व प्रभावी पद्धती तंत्रज्ञान विकसित केले आहे.

 • शेतीला अध्यात्माची जोड देऊन त्यांनी एक दिंडोरी प्रणीत “आदर्श शेती मॉडेल” विकसित केले आहे. त्यांची शेतीबद्दल असलेली नाविन्यपूर्ण विचारसरणी व बहुमुल्य योगदान यांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना बहुविध पुरस्कारांनी सम्मानित केले आहे.

              त्यांच्या शेतीतील नवनवीन उपक्रम तसेच नसर्गिक शेतीच्या पद्धतींचे फायदे याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने त्यांनी शेतकऱ्यांना विनामूल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे, याचा लाभ देशभरातल्या असंख्य शेतकरी तसेच युवा वर्गाने घेतला आहे.  गायींसाठी “मुक्त संचार गोठ्याची” संकल्पना, देशी गायींच्या विविध प्रजातींचे जतन व संवर्धन ही त्यांच्या गोपालन क्षेतातील योगदानाची वैशिष्ट्ये आहेत. देशी गायी व त्यांचे महत्त्व या बद्दल ते मोठ्याप्रमाणात शेतकरी व युवा वर्गात जनजागृतीचे कार्य अविरतपणे करीत आहेत.

  • जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतीच्या प्रभावी पद्धतीबद्दल माहिती प्रदान करण्याच्या हेतूने गेल्या ९ वर्षांपासून नाशिक येथे “जागतिक कृषी महोत्सवाचे” आयोजन ते यशस्वीरीत्या करीत आहेत. आजपर्यंत जगभरातल्या असंख्य शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा विनामूल्य लाभ घेतला आहे.
  • “दुष्काळग्रस्त तसेच आत्महत्याग्रस्त” अशा अनेक शेतकरी कुटुंबांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीची औजारे, त्यांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप तसेच योग्य मार्गदर्शनातून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यांचा त्यात समावेश आहे.
  • याव्यतिरिक्त त्यांनी आदिवासी भागातील युवक व शेतकऱ्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रमांचेआयोजन केले आहे, त्यात “विनामूल्य विवाह नोंदणी” तसेच विनाहुंडा-मानपान “विवाह सोहळ्यांचे” आयोजन या बाबींचा समावेश आहे. तसेच खालील विविध उपक्रमांचे आयोजन श्री. गिरीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात राबविण्यात येत आहे.

संस्थेची वैशिष्ट्ये

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट, दिंडोरी, जि.नाशिक
 • अध्यात्मिक व सात्विक शेती
 • सेंद्रिय व नैसर्गिक शेती
 • गटशेती व थेट शेतमाल विक्री
 • गावराण बीज संवर्धन
 • कृषी संशोधन
 • पाणी व्यवस्थापन
 • विनामुल्य कृषी प्रशिक्षण
 • कृषी मेळावे
 • अध्यात्मिक व सात्विक शेती
 • सेंद्रिय व नैसर्गिक शेती
 • गटशेती व थेट शेतमाल विक्री
 • गावराण बीज संवर्धन
 • कृषी संशोधन
 • पाणी व्यवस्थापन
 • विनामुल्य कृषी प्रशिक्षण
 • कृषी मेळावे

कृषीभूषण पुरस्कार

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला महाराष्ट्र शासनातर्फे सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार २०१३प्रधान करताना माननीय श्री. के.शंकरनारायणन, राज्यपाल-भारत सरकार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, व कृषीभूषण पुरस्कार स्वीकार करतांना ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. आबासाहेब मोरे व उपस्थित इतर कॅबिनेट मंत्री महोदय.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी-रत्न पुरस्कार

श्री आदरणीय गिरीश मोरे (आबासाहेब) यांना (श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला) पहिले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन-२०१३ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषिरत्न पुरस्कार प्रधान करताना. नामदार श्री राधा कृष्ण विखे पाटील (कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य), श्री स्वामी समर्थ सेवा व् आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) प्रमुख पिठाधीश प.पु.गुरुमाउली, संमेलनाध्यक्ष रा.रं.बोराडे व इतर कृषी मान्यवर. श्री स्वामी समर्थ सेवा व् आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) अंतर्गत श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट दिंडोरी. या विस्तार्त्मक करणा-या संस्थेला सेंद्रीय शेती , सेंद्रीय गट शेती, वेलवर्गीय व दुर्मिळ वनस्पती संशोधनाचे प्रात्यक्षिक विस्तारासाठी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय गिरीश मोरे (आबासाहेब) गेल्या १०-१२ वर्षापासून आपल्या स्वामीमय दिंडोरी नगरीत सेंद्रीय शेती , सेंद्रीय गट शेती, वेलवर्गीय व दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती, गो संवर्धन, एक गाय एक कुटुंब, नक्षत्र वन, सेंद्रिय व सात्विक भाजिपाला उत्पादन या सर्व संशोधनाचे प्रयोगांवर नुसती चर्चा करण्यापेक्षा शेतक-यांना प्रत्यक्ष शेतीवर नेऊन त्यांची प्रत्येक्षिके दाखवण्याचे काम दिंडोरीत केले जाते.